रुग्णालयात भरती ललित मोदींनी ‘या’ व्यक्तीला घोषित केले उत्तराधिकारी, दिली ४५५५ कोटींची संपत्ती

लंडनमधील रुग्णालयात दाखल झालेल्या आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) यांनी मुलगा रुचिर मोदी (Ruchir Modi) यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. कोविड संसर्गाने त्रस्त असलेल्या ललित मोदींनी केके मोदी फॅमिली ट्रस्ट या बिझनेस ग्रुपमध्ये सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान ही घोषणा केली आहे. मुलगी आलियाशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला असून ट्रस्टमधील माझ्या हिताची कमान मुलगा रुचिर मोदी यांच्याकडे सोपवावी असे मला वाटते, असे त्यांनी सांगितले. आता ललित मोदींनी मुलाला आपला उत्तराधिकारी बनवण्याबरोबरच 4,555 कोटी रुपयांची मालमत्ता त्यांच्याकडे सोपवली आहे.

28 वर्षीय रुचिर मोदी आधीच कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित आहेत. ते मोदी केअर आणि गॉडफ्रे फिलिप इंडिया लिमिटेडचे ​​संचालक आहेत. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, रुचिर हे मोदी व्हेंचर्सचे संस्थापक देखील आहेत. ते ट्वेंटी फोर सेव्हन कन्व्हिनियन्स स्टोअर्स आणि कलर बार कॉस्मेटिक ब्रँडच्या प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत.

क्रिकेट आणि कार प्रेमी आहेत रुचिर मोदी
ब्रिटनमधून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेले रुचिर राजस्थानमधील अलवर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. पाच वर्षांपूर्वी, रुचिर प्रसिद्धीच्या झोतात आले, जेव्हा त्यांनी जांभळ्या रंगाची मॅकलरेन 720S कार खरेदी केली. लंडनमध्ये राहत असताना त्यांच्याकडे कारचे कलेक्शन होते, जे चर्चेत होते. वडिलांप्रमाणेच त्यांनाही क्रिकेटची आवड आहे.

ललित मोदी यांना दोन मुले आहेत, रुचिर आणि आलिया. 2018 मध्ये रुचिर मोदीची आई मीनल मोदी यांचे कर्करोगाने निधन झाले. रुचिरला करीमा सागरनी नावाची सावत्र बहीण देखील आहे.

व्यवसाय वाढवण्याबरोबरच वाद हाताळण्याची जबाबदारीही 
आयपीएलमधील अनियमिततेच्या आरोपानंतर ललित मोदी देशाबाहेर आहेत. आता पूर्णपणे घोषणा करून व्यवसाय सांभाळण्याची कमान रुचिर मोदी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आता व्यवसाय वाढवण्यासोबतच या वादाला तोंड देण्याची जबाबदारी रुचिर मोदी यांच्यावर आली आहे.