मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात गोळीबार, ३३ वर्षीय व्यावसायिक गणेश कोकाटेची हत्या

ठाणे: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात गोळीबाराचा धक्कादायक प्रकार घडला. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निकटवर्तीयांमधील कामगार पुरवणाऱ्या गणेश कोकाटेंवर गोळीबार करून हत्या करण्यात आली. भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे रात्री हा प्रकार घडला असून ठाण्यात भितीचे वातावरण पसरले आहे. गणेश कोकाटे याचे वय 33 होते. व्यावसायिक वादातून ही हत्या झाली असल्याचे समजत आहे.

ठाणे येथील कामगार पुरविण्याचे काम करणाऱ्या गणेश कोकाटे आणि गणेश इंदुलकर यांच्यातील वाद विकोपाला जाऊन एकाची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान हत्या झालेला तरूण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील असल्याचे बोलले जात आहे. ठाणे येथील लोढामध्ये कामगार पुरविण्याच्या काम गणेश कोकाटे करत होता.

गणेश कोकाटे आणि गणेश इंदुलकर यांच्यात मागच्या काही काळापासून वाद होता. यापूर्वी गणेश कोकाटेवर गणेश इंदुलकर याने गोळीबार केला होता. त्यामध्ये चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. यातील गणेश इंदुलकर हा फरार होता. त्यानंतर बुधवारी रात्री गणेश कोकाटे ठाणे येथून कशेळी येथील घरी येत असताना काही अज्ञातांनी दुचाकीवरून आलेल्या आरोपीने गोळीबार कोकाटेंवर हल्ला करून फरार झाले. त्यानंतर त्वरित गणेश कोकाटेंना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.