कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ, राज्य सरकार ‘मिशन ऑलिम्पिक’ राबवणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा 

Devendra Fadavis :  कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. यामध्ये राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी होणाऱ्या कुस्तीगिरांचे मानधन ६ हजार वरून २० हजार, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचे मानधन ६ हजार वरून २० हजार तर हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी व रुस्तुम ए हिंद या कुस्तीगिरांचे मानधन ४ हजार वरून १५ हजार इतके करण्यात येईल. तसेच कुस्तीगिरांचे निवृत्ती वेतन अडीच हजारांवरून साडे सात हजार करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी आश्वासित केले. कुस्ती स्पर्धांमध्ये यशस्वी कुस्तीगीरांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यात येईल.

स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन संकृस्ती प्रतिष्ठानच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले होते.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, माजी खासदार अशोक मोहोळ, अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या सह राजकीय व कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा, महिंद्रा थार गाडी व रोख पाच लाख तर, उपविजेत्याला चांदीची गदा, ट्रक्टर व रोख अडीच लाख रूपायांचे बक्षीस देण्यात आले. राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील प्रत्येक वजनी गटातील विजेत्याला सुवर्णपदक व एसडी जावा गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, खाशाबा जाधव यांनी ६१ वर्षांपूर्वी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविले. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रातील कुस्तीगीरांना पदकांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यांच्या कामगिरीत सुधारणा व्हावी व त्यानी ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करावी, यासाठी राज्य सरकार मिशन ऑलिम्पिक हे अभियान सुरु करणार आहेत. भविष्यात महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरविण्याचा प्रस्ताव आल्यास त्याला राज्य सरकार प्रोत्साहन देणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

राजकीय आखाड्यात महाराष्ट्र केसरीचा किताब पटकाविलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला, अशी टिपणी फडणवीस यांनी केली. स्पर्धेच्या भव्य दिव्य व यशस्वी आयोजनाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी संयोजक मुरलीधर मोहोळ यांचे तोंडभरून कौतुक केले.

ब्रिजभूषण शरण सिंग म्हणाले, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील संबंध हे पहिल्यापासूनच खूप चांगले आहेत. महाराष्ट्राचे सुपुत्र खाशाबा जाधव यांनी ६१ वर्षांपूर्वी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविले, त्यानंतर मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रातील पैलवान मागे पडले. कुस्तीला पुन्हा एकदा वैभावाचे दिवस आणण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, मुलीना सर्वच क्षेत्रात पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोडी प्रोत्साहन देत आहेत. दिपाली सय्यद यांनी महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु करावी, अशी मागणी केली आहे, त्याचा सकारात्मक विचार करावा.

गिरीश महाजन म्हणाले, कुस्तीगीर प्रचंड मेहनत करून आपली ताकद पणाला लावत असतो. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव उंचावत असतो. त्यामुळे कुस्तीगीरांच्या मानधनात वाढ करण्यात येईल. त्यांच्या खुराकाची जबाबदारी सरकार घेईल. कुस्ती हा गरीबाच्या घरातला, ग्रामीण भागातील रांगडा खेळ आहे. त्याला राजाश्रय देण्याची गरज ओळखून आम्ही संरकारच्या पातलीवर लवकरच निर्णय घेऊ.

खासदार रामदास तडस म्हणाले, कुस्तीगीरांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी नोकरी, वैद्यकीय मदत, तालुका व जिल्हा स्तरावर क्रीडा संकुलात mat देण्यात यावी. तसेच कुस्तीचे प्रेरणास्थान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मश्री देण्याचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवावा.

स्पर्धेचे संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी प्रास्ताविकात सांगितले की, ज्या मामासाहेब मोहोळ यांनी ६५ वर्षापूर्वी महाराष्ट्र केसरीची सुरुवात केली. त्या मोहोळ कुटुंबीयांकडे या प्रतिष्ठीत स्पर्धेचे आयोजन आले. ही स्पर्धा अत्यंत भव्यदिव्य, सर्वांच्या स्मरणात राहील अशा पद्धतीने आयोजित करून मामासाहेब यांना आदरांजली वहाण्याची संधी आम्हाला मिळाली, याचे समाधान आहे.