आंतरराष्ट्रीय कराटे सुवर्ण पदक विजेत्या प्रणितावर उपासमारीची वेळ; कठीण काळात मनसे मदतीला धावली 

तुळजापूर – श्रीलंका  येथे 23 सप्टेबर  2017 रोजी पार  पडलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्युपिल्स ऑलिंपिक स्पर्धेत कराटे मध्ये पाकिस्तानच्या खेळाडूचा पराभव करून भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या रामतीर्थ ता . तुळजापूर येथील प्रणिता मोहन पवार या विद्यार्थीनी वर आज उपासमारीची वेळ आली आहे .

प्रणिताचे वडील रिक्षा चालवुन कुटुंबियांना सांभाळत होते व चरितार्थ चालवित होते . परंतु प्रणिताच्या वडीलांचे गेल्यावर्षी कोरोनामुळे निधन झाले. वडीलांच्या अचानक जाण्याने प्रणिताच्या कुटुंबाची स्थिती हालाखीची बनली कारण घरातील कर्ताच गेल्याने कुदुंबावर उपासमारीची वेळ आली .

प्रणिताची दुसरी बहीण इ. १२ वी व लहान भाऊ इ ७ वी मध्ये शिक्षण घेत आहे. प्रणिता १० वीत आहे. अशा कठिण परिस्थितीत स्वतःची शेतजमीन व उत्पनाचे दुसरे काहीच साधन नसल्याने प्रणिताच्या आईला मजुरीने कामाला जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह अत्यंत काटकसरीत भागवावा लागत आहे.

दरम्यान, ही बाब समजताच मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, व त्यांचे सहकारी पदाधिकारी  यांनी तातडीने  प्रणिता व तिच्या कुटुंबियांची घरी जावून भेट घेतली . सर्व परिस्थिती जाणून घेतल्यानंतर मनसेच्या वतीने किराणा साहित्य, कपडे, शैक्षाणिक व इतर आवश्यक साहित्य रोख रकमेसह प्रणिताच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले. प्रणिताच्या यापुढील शिक्षणाची व इतर आवश्यक संपूर्ण खर्चाची जबाबदारी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी घेतली .

प्रशांत नवगिरे यांनी या संपुर्ण घटनेची सविस्तर माहिती जिल्हा क्रिडा अधिकारी सारिका काळे यांना फोनवरून दिल्यानंतर त्यांनीही उद्याच प्रणिताची तिच्या घरी भेट घेऊन सर्वोतोपरी सहकार्य करून सर्व शासकिय मदत मिळवून देऊ असे सांगितले . मनसेच्या या मदतीमुळे प्रणिता व संपूर्ण कुटुंबीयांना अश्रू अनावर होऊन अश्रुंचा बांध फुटला .

यावेळी रामतीर्थ येथील लक्ष्मण राठोड, गुरुदेव राठोड यांचेसह महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते . मनसेच्या  या कार्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. दरम्यान,  प्रणिताला मनसेचे  जिल्हाअध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी  केलेली मदत पाहुन तिला  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी मुंबईला भेटायला बोलवले आहे.