संतांच्या महाराष्ट्रात आज ओबीसींची अशी अवस्था का? पंकजा मुंडे कडाडल्या

औरंगाबाद : औरंगाबादेत आज भाजपच्या ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या उपस्थित होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीला चांगलच फैलावर घेतलं आहे. मी आधीच उपाशी आणि त्यात उपवास, बहुजनांची अवस्थाही अशीच आहे. गोपीनाथ मुंडे म्हणायचे ज्याला जातीची आणि मातीची लाज वाटते त्यांचा काही उपयोग नाही. ज्यांना जातीची आणि मातीची लाज वाटते आशा लोकांना राजकारणात उभं राहण्याची आवश्यकता नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

तर जातीवाद पूर्वीही होता, जातीवाद आताही आहे. गावामध्ये गेल्यावर जातीवादाच्या भिंती अजूनही दिसतात. संतांच्या महाराष्ट्रात आज ओबीसींची अशी अवस्था का? असा सवालही त्यांनी केलाय. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकवून दाखवा आणि त्यानुसार निवडणुका घेऊन दाखवा, अशा शब्दात मुंडे यांनी ठाकरे सरकारला ललकारलं आहे.

दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री असल्याच्या वक्तव्यावर देखील पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या,चांगली गोष्ट आहे. आनंद आहे. एखाद्या व्यक्तीला आनंद वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. लोकांचं प्रेम मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे, असं पंकजा म्हणाल्या. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे, असं फडणवीस म्हणाल्याचं पंकजा यांना पत्रकारांनी सांगितलं. त्यावर पंकजा यांनी लगेच त्यावर हसून हरकत घेतली. जनतेच्या मनातला शब्द तुम्ही खेचू शकत नाही, असं त्या म्हणाल्या.