नगर रस्त्यावर खराडी, विश्रांतवाडी येथे उड्डाणपुल उभारणार – जगदीश मुळीक

पुणे – वडगावशेरी मतदार संघातील नगर रस्त्यावर खराडी आणि विश्रांतवाडी येथे मंजूर करण्यात आलेल्या उड्डाण पूल (Flight bridge) उभारण्याचे काम निधीची तरतूद करून लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी भाजपचे (BJP) शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांची भेट घेऊन केली. या वेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक (Yogesh Mulik), माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr. Siddharth Dhende), माजी सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत सन 2018 मध्ये शहरातील 200 किलोमीटर रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते. त्यात पुणे-नगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वात धोकादायक असल्याची बाब समोर आली होती. त्याचा विचार करून पुणे नगर रस्ता हे एक एकक मानून तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा तयार केला होता, त्यामध्ये मेट्रो मार्गांचे नियोजन, बीआरटी मार्गांचे सक्षमीकरण, पुरेशा बसव्यवस्था, आणि गोल्फ चौक, खराडी कल्याण नगर, येरवडा, विश्रांतवाडी येथे आवश्यकतेप्रमाणे उड्डाणपूल किंवा ग्रेड कामे अंदाजपत्रकात सुचविली होती. त्यापैकी गोल्फ चौकातील उड्डाणपुलाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. खराडी येथे उड्डाणपुलासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सूतोवाच केले. राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.’