घरात बनविलेल्या 1 किलो चिवड्यापासून सुरू झालेल्या व्यवसायाची आज लाखोंमध्ये उलाढाल

अंग तुझ्या हातचा हा चिवडा कसला भारी झालायं. आपण यांचा बिजनेस करू. खूप चालेल बघ, प्रत्येक घरात असे संवाद आपल्या कानी पडतात पण क्वचित काही गृहिणी या संवादाचे रूपांतर व्यवसायात करतात. सध्या पुण्यात अशाच तिच्या हातच्या मका पोह्याच्या चिवड्याची चर्चा सुरू आहे. जो चव चाखेल त्याला ही चव आवडतच आहे. ही चव आहे पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील इशिता फूड प्रॉडक्ट यांच्या चिवड्याची . इशिता फुडस चालवितात पूर्वी गृहिणी ते आता एक स्मार्ट उद्योजिका असलेल्या साधना ललित सोनी .  साधना सोनी यांची यशोगाथा प्रत्येक तीच्यासाठी प्रेरणादायी आहे, जिच्या हातची चव घराघरात आवडीने चाखली जाते.

सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील चिखलठाण या छोट्या गावात साधना यांचा जन्म झाला. साधना यांनी मोठ्या जिद्दीने पुण्यात येऊन बी कॉम पर्यतचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवाती पासूनच साधना यांच्यामध्ये काहीतरी करण्याची धडपड होतीच.  कुठे एल.आय.सीचा कोर्स कर कुठे पापडचा व्यवसाय कर असं सुरूच होतं. कारण त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची एक धडपड होती. जी त्यांना शांत बसू देत नव्हती.

साधना अशोक श्रीश्रीमाळ 2010 साली साधना ललित सोनी झाल्या. लग्न करून साधना पुणेकर झाल्या. लग्नानंतर ललित यांनी साधना मोठा सपोर्ट केला. साधना यांनी अनेक नवीन गोष्ट शिकल्या. स्वताचं काहीतरी करायचं हे सतत डोक्यात चालूच होतं. एक दिवस साधना यांनी घरात पातळं पोह्याचा चिवडा बनविला होता. ललित यांनी चव चाखली आणि म्हणाले कसला सुंदर बनविला हा चिवडा, तू हा बनव आपण यांची विक्री कर. साधना यांनी ही गोष्ट हसण्यावारी घेतली पण ललित मात्र सीरियस होते. ते म्हणाले तू बनवून मला यांचे काही नमुने दे मी माझ्या ओळखीतल्या दुकानदारांना देतो, प्रयत्न  करून पाहू.

साधना यांनी एक किलो चिवडा बनविला आणि त्यांचे छोटे-छोटे पॅकेट बनविले. ललित यांनी त्यांच्या ओळखीतल्या स्वीट मार्ट, किराणा दुकानदार यांना ते नमुने दिले. काय सांगता अनेकांना ते नमुने प्रचंड आवडले. कमी तेलकट, खुसखुशीत चिवडा सर्वाना आवडला. कॅम्पमधील एका मोठ्या स्वीट मार्टने साधना यांना पहिली ऑर्डर दिली. मार्च 2018 रोजी साधना यांच्या घरगुती व्यवसायास सुरुवात झाली.

सुरुवातीच्या काळात किलो-दोन किलो अशा ऑर्डर त्या घरीच करून देत. हळू- हळू ऑर्डर वाढत गेल्या. त्या नंतर त्यांनी त्या राहत असलेल्या एका इमारतीत एक छोटा फ्लॅट भाड्याने घेऊन त्यांनी तेथे इशिता फुडस सुरू केले.  पातळ पोहा,मका पोहा,भडंग भेळ,मसाला शेव असे अनेक प्रकार बनविण्यास सुरुवात केली.  मागील वर्षी साधना यांनी मार्केट यार्ड येथे तब्बल 2000 हजार स्केअर फुट जागा भाड्याने घेऊन तेथे सुसज्ज असा कारखाना उभा केला आहे. आता त्यांच्याकडे 8 महिला कामास आहेत. दररोज त्या 100 किलो चिवडा बनवितात.

सुरुवातीस प्लॅस्टिक पॅकिंग करून त्यावर स्टीकर लावत आता त्यांनी उत्तम अशी पॅकिंग देखील सुरू केली आहे. उत्तम चव, किफायतशीर दर,कमालीची स्वछता यामुळे साधना यांचा चिवडा पुणेकरांच्या चवीस पात्र ठरला आहे. लॉक डाऊन काळात काही काळ साधना यांना देखील थांबावे लागले पण त्या नंतर त्या पुन्हा नव्या जोशाने कामाला लागल्या आहेत.

साधना यांच्या या सर्व प्रवासात त्यांचे पती ललित सोनी यांनी त्यांना मोठा सपोर्ट केला. त्यांच्या आग्रहामुळे आणि खंबीर पाठिंब्यामुळे हा व्यवसाय करू शकले असे साधना आवर्जून सांगतात. साधना यांना त्यांची बहीण सपना लोढा, सासू,सासरे आणि कुटुंबीय यांनी देखील मोठा सपोर्ट केला. त्यामुळे अनेक महिल्यांच्या हाती उत्तम अशी चव असते पण त्यांची चव घरापुरतीच मर्यादित राहते, साधना यांच्या सारखी उद्योजिका सर्वानमध्ये असते पण काही मोजक्याच पुढे येतात. प्रत्येकीमध्ये असलेल्या साधनाचा शोध आपण स्वताच घ्यायला हवा.

  लेखन – भावना बाटीया संचेती 

 

 

तुमच्या कडे देखील अशाच काही प्रेरक यशोगाथा असतील तर आझाद मराठी नक्कीच त्यास एक व्यासपीठ देईल.तुमची एक यशोगाथा अनेकांना त्यांच्या स्वप्नाचा मार्ग शोधून देईल, चला तर मग पाठवा  आम्हाला तुमच्या या यशोगाथा आमचा मेल आयडी आहे[email protected]