Ulhas Bapat | नैतिकतेच्या आधारावरच देशातील लोकशाही टिकू शकेल – उल्हास बापट

Ulhas Bapat : गेल्या ७५ वर्षांमध्ये १२० देशांमध्ये मध्ये लोकशाहीची घसरण झाली, परंतु भारतामध्ये मात्र आजही लोकशाही टिकून आहे. अनेक कारणांमुळे लोकशाहीला (Democracy) धोका निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, परंतु हा देश लोकशाहीच्या मार्गावर टिकला, तो येथील राज्यघटनेमुळे. देशातील राज्यघटना टिकली तरच लोकशाही टिकू शकेल. त्यासाठी नैतिक विचारांची माणसे राजकारणात येणे गरजेचे आहे. नैतिकतेच्या आधारावरच देशातील लोकशाही भविष्यात टिकणार आहे, असे मत ज्येष्ठ संविधानतज्ञ प्रा. उल्हास बापट ( Ulhas Bapat) यांनी व्यक्त केले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट (Jadwar Group of Institutes) तर्फे न-हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ७ युवा संसदेमध्ये ‘भारतीय राजकारणाची ७५ वर्षे किती नैतिक किती अनैतिक’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर (Sudhakar Jadwar), उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर (Shardul Jadwar), खजिनदार सुरेखा जाधवर (Surekha Jadwar), ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई (Hemant Desai), विद्यार्थी प्रतिनिधी महादेव रंगा, राधेय बहेगावकर यावेळी उपस्थित होते.

प्रा. उल्हास बापट म्हणाले, देशामध्ये लोकशाही टिकण्यासाठी महत्त्वाची कारणे म्हणजे राज्यघटना, पंडित नेहरू यांनी पंतप्रधान पदाच्या काळात केलेले महत्त्वपूर्ण कार्य, धर्मनिरपेक्षता ही आहे. परंतु आज अनेक शक्ती देशाची लोकशाही आणि संविधान धोक्यात आणण्याचे काम करत आहेत. या देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न जर केला तर या संविधानामध्ये आणि राज्यघटनेमध्ये ते शक्य होणार नाही.

हेमंत देसाई म्हणाले, नैतिक अनैतिकतेच्या केवळ गप्पा मारून देश मजबूत होणार नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी कोलांट्या उड्या मारणाऱ्या राजकारण्यांनी देशातील विचारसरणीचा अंत केला आहे. विवेकाचा अंत करून कोणत्या प्रकारचे राजकारण सुरू आहे आणि यातून तरुणांनी काय बोध घ्यावा, अशी परिस्थिती सध्या देशामध्ये आहे. सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता असा जर आदर्श आपण तरुणांसमोर ठेवणार असू तर देशाची लोकशाही कशी मजबूत होणार ? याचा विचार तरुणांनी करणे गरजेचे आहे. आणि त्यासाठीच चांगल्या विचारांच्या सुशिक्षित तरुणांनी राजकारणामध्ये येणे गरजेचे आहे.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, नैतिकता हा कोणत्याही राजकारणाचा पाया आहे. नैतिकता ही कोणत्याही शाळेमध्ये शिकवून येत नाही, तर त्यासाठी समाजाचे भान असावे लागते. असे समाजाचे भान असणारे नैतिक चारित्र्याचे तरुण घडावेत, यासाठी या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे शहरात मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना यांना निवेदन देणार – गोऱ्हे

Rishabh Pant | ‘खोलीत जाऊन खूप रडायचो…’, धोनीशी होणाऱ्या तुलनेवर ऋषभ पंतचा धक्कादायक खुलासा